स्टोन आर्ट

शनिवारी सकाळी कणकवलीतील प्रसिद्ध सर्जन डॉ. विद्याधर तायशेटे सरांशी फोनवर बोलणं झालं. सर म्हणाले उद्या एक कार्यक्रम आहे.त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना काहीतरी विशेष भेटवस्तू द्यायची आहे. तुझं स्टोन आर्ट माझ्या डोक्यात आहे. मला तुझ्याकडून त्यांचं ‘स्टोन आर्ट’ बनवून मिळेल का..? मी म्हणालो ,सर इतक्या कमी कालावधीत बनवणं कठीण आहे. तरी ही तुम्ही फोटो पाठवा.मी पाहतो जमतंय का..त्यावर सर म्हणाले, बरं, एक काम कर मला भेटायला हॉस्पिटलमध्ये ये निवांत बोलू.
दरम्यान सरांनी फोटो पाठवला होता.तो पाहून दगड शोधायला गेलो.त्यात बराच वेळ गेला.हताश होऊन घरी आलो.
संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये पोचलो.सरांनी माझ्या कलेचं कौतुक केलं शिवाय कलेबद्दल अगदी उत्सुकतेने जाणून देखील घेतलं.
मला म्हणाले, बघ जमतंय का हे स्टोन आर्ट करायला. ते माणूस माझ्यासाठी खूप विशेष आहेत रे. सरांच्या आवाजातील आर्जवता पाहून मीच खजिल झालो. त्यांना म्हटलं काम होईल सर. त्यावर सर हात मिळवून म्हणाले खूप धन्यवाद.
घरी पोचल्यावर नदीकिनारी तडक निघालो. तिन्हीसांजेची वेळ होती. म्हटलं दगड शोधूनच माघारी येईन. शेवटी एक दगड सापडला.
रात्रभर दगडावर काम केलं. पहाटे चार वाजता काम पूर्ण झालं. त्याचा फोटो सरांना व्हाट्सअप वर पाठवला. तसं त्यांना फोन करून सांगितलं.सर म्हणाले, ते आर्ट घेऊन ये हॉस्पिटलमध्ये.की माणूस पाठवू तुझ्या घरी..? मी म्हणालो, नको मीच येतो घेऊन. हॉस्पिटल मध्ये पोचलो.केबिन मध्ये जाऊन ते स्टोन आर्ट पिशवीतून बाहेर काढून सरांना दाखवणार इतक्यात सर खुर्ची वरून उठून उभे राहुन त्यांनी ते स्टोन आर्ट स्वीकारलं.खूप खुश झाले. माझं काम बघून. म्हणाले मोठं काम केलंस. ह्याचे मी तुला पैसे देणार.किती झाले ते सांग.मी किंमत सांगताक्षणी तात्काळ ती रक्कम त्यांनी माझ्या हातात सुपूर्द केली.
दुसऱ्या दिवशी त्या कार्यक्रमात मी केलेलं स्टोन आर्ट सर्वांसमक्ष अध्यक्षांना देण्यात आलं. ते आर्ट पाहून अध्यक्षांनी आश्चर्य चकित होऊन डोक्याला हात लावला. त्या कार्यक्रमात माझे वडील उपस्थित होते. अध्यक्ष वडिलांना भेटून म्हणाले मुलाला खूप धन्यवाद सांगा. अप्रतिम कला आहे त्याच्याकडे.
असा हा विलक्षण अनुभव.
आपली कला अशी अनेकांना आनंद देते ते पाहून खूप बरं वाटतं. अधिक काम करण्याची, मेहनत घेण्याची उर्मी वाढते.

सुमन दाभोलकर.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *