आजोळ चे घर

नुकताच गणपतीत आजोळी गेलो होतो.119वर्ष जुनं घर.मोडकळीस आलेलं.
लहानपणी च्या असंख्य आठवणींनी भरलेलं.
घराचे बाहेरून फोटो काढले.
त्या खिडक्या,त्या भिंती.अजून ही बोलक्या.कैक पावसाळे झेललेल्या.खिडकीच्या त्या लोखंडी गजांना पकडुन कित्येकदा आतून बाहेर डोकावलय.. गंजलेल्या त्या लोखंडी गजांचा गंध कसा विसरू..? लहानपणी खिडकी बाहेरच्या रस्त्याने ये जा करणारी माणसं अजूनही आठवतात. खिडकीतली सकाळ, दुपार, रात्र आठवते. खिडकीतून पाहिलेलं रात्रीचं आभाळ आठवतय. चांदण्या,चंद्र आठवतय.आजीचं ते खिडकीत बसणं आठवंतय. त्या खिडक्या पाहिल्या की वाटतं त्या सदोदित सताड डोळ्यांनी कुणाची तरी वाट पाहत आहेत.त्या कमालीच्या बोलक्या का आहेत..?
माडांच्या लाकडाचं घराचं ते छत अजूनही आधार देणारं का भासतंय..?त्या छताने कित्येकांना आधार दिलाय..सावली दिलीय..अजूनही वरून पाहतय सर्वांना. वडीलधाऱ्या स्वभावाने.”भिऊ नकोस मी तुमच्या वर आहे.”
त्या भिंतीवर क्रिकेट खेळलेल्या बोलांचे ठसे रुबाबात आहेत.नळ्या च्या खापरी ने अनेकदा कोरलं होतं. त्यातलं काही नाही दिसलं.बहुतेक विरून गेलं असावं.मात्र आठवणीं विरत नाहीत.त्या धुसमुसत असतात.बाहेर पडायला एखादी फट पाहत असतात.

सुमन दाभोलकर.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *